• Homepage
  • Articles
  • कथा दोन सापांची : जीवो जीवस्य जीवनम् !!

कथा दोन सापांची : जीवो जीवस्य जीवनम् !!

अनेकदा जंगलात बरीच पायपीट करूनही अपेक्षित असे पदरात काही पडत नाही. परंतु त्यामुळेच की काय पुन्हा पुन्हा जायची ओढ अधिकच तीव्र होत राहते. आणि कधीतरी अवचित ध्यानी-मनी नसताना काही प्रसंग अनुभवता येतात. आत्ताच्या ट्रीप मध्ये अशीच एक गोष्ट जवळून पाहता आली. Biology मध्ये आपण Cannibalism बद्दल वाचतो (Cannibalism म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर आपणच आपल्यासारख्या दुसऱ्या प्राण्याला खाणे). ‘हरणटोळ’ हा झाडावर राहणारा हिरव्या रंगाचा साप. ‘खापर खवल्या’ जमिनीवर पालापाचोळयात, साठवलेल्या ओल्या लाकडांच्या मधून, भुसभुशीत मातीत वावरणारा. आधी झाडावर हिरव्या पानामध्ये ‘हरणटोळाचा’ हिरवा रंग वेगळा दिसायलाच वेळ लागला. पानामागे नक्की काय चालू आहे हे कळतच नव्हते. येथे ‘हरणटोळ’ या सापानी बरोबर अंदाज घेत ‘खापर खवल्याला’ आधी धरला. आणि हळू हळू झाडावर न्यायला लागला. एक कडकडून चावा घेत त्यानी ‘खापर खवल्याला’ आधी अर्धमेला केला. ‘खापर खवल्यानी’ मग तशाही परिस्थितीत ‘हरणटोळाला’ वेढा घालून शेपटीने तडाखा दिला. ‘हरणटोळाच्या’ शरीरावरचे खवले अक्षरश: रागाने फुलले होते. परंतु ‘हरणटोळाची पकडच इतकी जबरदस्त होती की हळू हळू ‘खापर खवल्याचा’ प्रतिकार थंड पडायला लागला. आणि मग एका क्षणी ‘हरणटोळानी’ ‘खापर खवल्याला’ तोंडाकडून गिळायला सुरुवात केली. जास्तीत जास्त ५-७ मि. चा थरार !! संपलं सगळं. कशाचा कशाला मागमूस नाही की आवाज नाही. शांतपणे आपण त्या गावचेच नाही या अविर्भावात दुसऱ्या झाडाच्या फांदीवर निघून गेला. पडला असेल आता शांत कुठेतरी हे सगळं पचवत.  आधी मी सापाला गांडूळ खाताना पाहिलं होतं. साप, बेडूक किंवा उंदीर खाताना चे फोटो पहिले होते. पण सापानी सापाला खाताना हे सगळं प्रत्यक्ष पाहणं हा एक विलक्षण अनुभव पोतडीत जमा झाला.

डॉ. अंकूर पटवर्धन

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on tumblr
Tumblr
Share on print
Print
Share on email
Email