या कीटकांच्या बसूनी पाठी सहल करूया जंगलाची !
चला मुलांनो आज पाहूया गम्मत जम्मत कीटकांची !!
आपल्या सगळ्यात परिचित कीटक म्हणजे माशा, गांधील माशा, मुंग्या, मधमाशा, फुलपाखरे आणि पतंग. असे म्हणाले जाते की जगातले सगळे कीटक एकत्र केले आणि त्यांचे वजन केले तर सर्व माणसांच्या एकत्रित वजना पेक्षा ते जास्तं भरेल. संपूर्ण जगभरात काही लाख इतक्या कीटकांच्या जाती आहेत.
यातील मधमाश्या आणि फुलपाखरे हे परागीभवनाचे निसर्गाच्या आणि माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे कार्य पार पाडत असतात. जगभरात अन्नधान्य उत्पादन करू शकणाऱ्या एकून पैकी सुमारे ७५ % पिकांचे परागीभवन हे कीटकांमार्फत होते. तसेच या पृथ्वीवर आढळणाऱ्या सुमारे ९० % सपुष्प वनस्पती या परागीभवनासाठी प्राण्यांवर अवलंबून असतात. ढोबळ मानाने विचार करायचा झाल्यास सुमारे २ लाख प्राणी प्रजाती या परागीभवनाचे कार्य पार पाडतात व त्यातील १.९५ लाख हे कीटक वर्गात मोडतात. मधमाशांच्या खालोखाल फुलपाखरे परागीभवनाचे कार्य पार पाडत असतात. असे म्हणता येऊ शकेल की आपण खात असलेला अन्नाचा प्रत्येक तिसरा घास हा परागीभवनामुळे तयार झालेला आहे. परागीभवनामुळे बीजधारणा होऊन जंगल वाढीस चालना मिळते. पर्यायानी मिळत असलेला ऑक्सिजनसुद्धा या परागीभवनाचेच एक अंग आहे.
कुठल्याही परिसंस्थेची स्थिरता ही त्याच्या सर्व घटकांवर अवलंबून असते. परंतु कीटक हे फक्त पिकांचे नुकसान करतात या धारणे पोटी बेसुमार आणि अनिर्बंध अशा कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे आपण मधमाश्या आणि फुलपाखरे यांसारखे मित्रकिडे देखील गमावून बसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर वेळीच कीटकांचे महत्त्व आपण ओळखले नाही तर एखादा डोलारा जसा कोसळतो तशीच आपली परिसंस्था सुद्धा कोसळेल. आणि आपण सुद्धा नष्ट होऊ.
एखाद्या जातीचे महत्त्व त्या जातीचे स्थानिक पर्यावरण टिकवून ठेवण्यात किती योगदान आहे व त्यामुळे इतर जीवनावश्यक गोष्टींना कसा फायदा होतो यावरून ठरू शकते, उदा. अंजनी, कुंभा, गेळा, किंजळ,चांदाडा यांसारखी वरवर उपयोगी न भासणारी वन्यझाडे स्वतःकडे अनेक मधमाश्या, फुलपाखरे , कीटक यांना आकर्षित करतात. अशाच कीटकांच्या जैवविविधतेमुळे परागीभवन होऊन आजूबाजूला असणारी आंबा, फणस, चिकू, काजू, यांसारखी झाडे फळतात. म्हणजेच अनेक प्रकारची झाडे- झुडुपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले तर प्राणी, पक्षी आणि फुलपाखरे, कीटक तर वाढतीलच; पण आपल्या बागाही टिकून राहतील.
फुलपाखरांचा उल्लेख हा अगदी वेदांमध्ये सुद्धा आढळतो. हे सर्वश्रुत आहे की हिंदू संस्कृती मध्ये वृक्ष,पशु-पक्षी यांना विशेष स्थान आहे. नाग, गाय, अस्वल , कुत्रा, मासा, कासव, मोर, कावळा, घार, गिधाड, खार या सर्वां बरोबर फुलपाखराचा सुद्धा उल्लेख आढळतो. आपल्या पूर्वजांना निसर्गातील सर्व घटकांबद्दल प्रेम आणि आस्था होती.
भारतातील विविध भागांमध्ये आढळून येणाऱ्या फुलपाखरांच्या १३२० जाती पैकी अति दुर्मिळ, नष्टप्राय होणाऱ्या अशा १२८ प्रजाती आहेत. आपल्या जवळच्या सह्याद्री पर्वत रांगांचा जैवाविविधतेने नटलेल्या काही मोजक्याच प्रदेशांमध्ये समावेश होतो. या पश्चिम घाटात सुमारे ३४६ प्रजाती आढळून येतात, व त्यातील काही अशा आहेत (४१) की ज्या इतरत्र कुठेही आढळून येत नाहीत. भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (सह्याद्री बर्ड विंग किंवा सदर्न बर्ड विंग) हे सुद्धा आपल्याला पश्चिम घाटातच आढळून येते. म्हणजेच अशा सर्वांचे संरक्षण आणि संवर्धन व्हायला हवे.
सकाळी सकाळी फिरायला जाताना किंवा तळजाई, लों कॉलेज टेकडीवर फेरफटका मारताना किंवा निसर्गरम्य अशा ठिकाणी ट्रीप ला गेल्यावर, शेतातून फिरताना अनेकदा फुलपाखरे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांवर बसलेली दिसायची. लक्ष वेधून घ्यायची. जेव्हा आणखी खोलवर निरीक्षण करायला सुरुवात केली तेव्हा असे लक्षात आले की काहीतरी नक्की रचना आहे यांच्या पंखांची, त्यांच्या आकाराची, त्यांना असलेल्या सोंडेची. मनात विचार आला की फुलपाखरे कसे ठरवत असतील की कुठल्या फुलांवर बसायचे? त्यांच्या आवडतीची किंवा नावडतीची अशी काही झाडे, फुले असतील का? का ती फुलांच्या रंगामुळे आकर्षिली जात असतील? का फुलांमध्ये असलेल्या गोड अशा रसाकडे? की दोन्ही? तसेच विविध प्रकारच्या फुलपाखरांची आवडती झाडे वेगवेगळी असतात का? फुलपाखरांचा आकार आणि त्यांची सोंड यांचे काही नाते आहे का? का आकार आणि पोट यांचे आहे? का सोंडेचा आकार आणि फुलांचा आकार यांचे? असे अनेक प्रश्न पडायला लागले.
जेव्हा आम्ही पुण्याच्या जवळपास आढळणाऱ्या फुलपाखरांची निरीक्षणे आणि अभ्यास केला तेव्हा आम्हाला अशा अनेक गोष्टी आढळून आल्या. तसेच हे ही लक्षात आले की फुलपाखरांना प्राधान्यक्रमाने पांढऱ्या रंगाच्या फुलांमधील मध प्यायला आवडतो. त्या खालोखाल पिवळ्या आणि गुलाबी (पांढरा ३८% > पिवळा २०% > गुलाबी १५% > हिरवा, निळा, केशरी, लाल ई. सर्व मिळून २७%). तसेच प्रत्येक फुलामधील रसात शर्करेचे प्रमाण आणि शर्करेचे प्रकार हे वेगवेगळे असतात, जसे की ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज, माल्तोज इत्यादि.
फुलपाखरांमध्ये अनेक गमती जमती आढळून येतात. काही प्रजातींच्या फुलपाखरांमध्ये नर आणि मादी त्यांच्या आकारावरून अथवा रंगावरून वेगवेगळे ओळखता येतात. काहींच्यामध्ये पंखांवर उन्हाळ्यात दिसून येणाऱ्या रंगछटा आणि पावसाळ्यातील रंगछटा यामध्ये फरक असतो. तसेच काही फुलपाखरे थोड्या प्रमाणात विषारी असल्याने पक्षी ते खात नाहीत. अशा वेळा काही हुशार फुलपाखरे विषारी फुलांच्या पंखावरील रचना व नक्षी यांची नक्कल करतात आणि पक्ष्यांचे खाद्य होण्यापासून स्वतःला वाचवतात. काही फुलपाखरे आपल्या परिसराशी इतकी एकरूप होतात की ती पटकन दिसत सुद्धा नाहीत (Camouflage).
डॉ. अंकूर पटवर्धन (९८२३८१२६५३) आणि डॉ. तेजस्विनी पाचपोर (७७७४०७५०३१)