लाईफ थ्रू द विंडो !!

सध्या आपापल्या सगळ्यांची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते आहे. कोकिळेचा मंजुळ आवाज काहींना जागे करतोय, तर काहींना चीमण्यांचा चिवचिवाट. मला मात्र ‘नाचऱ्या’ नावाच्या पक्षाच्या आवाजाने जाग येतीये. बरोब्बर पहाटे ५.१५-५.४५ दरम्यान त्याची शीळ कानी येते. आणि थोड्याच वेळात कधी फांदीवर, तर कधी क्षणात जमिनीवर पिसारा फुलवत त्याचा अक्षरशः नाच चालू असतो. ‘नाचऱ्या’ म्हणजे White Browed Fantail Flycatcher – छोटा काळ्या रंगाचा बुलबुलाएवढा, डोळ्यावर पांढरी भुवई असणारा पक्षी. कोकीळ तर जणू आपल्याला वसंत ऋतुचे आगमन झाले  आहे हेच सांगत असतो. आपल्या बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की कोकिळा (मादी) गाते, परंतु ‘नर’ कोकीळ गात असतो. श्रावणात जसे सगळीकडे हिरवेगार असते तसे वसंतात नवी पालवी आणि ग्रीष्मात फुलांचा बहर  अनुभवायला मिळतो. हे निसर्गाचे रूप जसे आपल्याला आनंद, उत्साह देते तसेच आपल्या पक्षीमित्रांनासुध्दा चला आता घरे बांधायला घ्या असे सुचित करते. आजच्या लेखात आपण भेटणार आहोत आपल्या परसदारातल्या    पक्षीमित्रांना.

वसंत ऋतु मध्ये कोण कोणते पक्षी आपल्याला आपल्या घरा जवळ     दिसतात  (sighting), त्यांचा आवाज येतो (call) आणि त्यांची घरटी दिसतात (nesting) याच्या नोंदी  आपण घरबसल्या करू शकतो. या वर्षी lockdown मुळे सगळीकडे सामसूम आहे. त्यात जर तुम्ही नीट पाहिलत, कान  देऊन ऐकलंत तर तुम्हाला खुप वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतील व ते दिसतीलही. एरवी गाड्या आणि माणसांच्या कोलाहलात हे सगळे आवाज  हरवून जातात. आज संधी मिळाली आहेच तर या मित्रांच्या मैफिलीचा आनंद जरूर घ्या.

कबुतर, कावळे, मैना, साळुंकी,चिमणी आणि पोपट हे तर आपण सगळ्यांनीच आजूबाजूला बघितलेत. पण त्यांची घरटी आपण कधी नीट पाहिली आहेत का? कावळे सुद्धा अगदी निगुतीने घरटं बांधतात. वर्षभर ती घरटी रिकामी असतात पण वसंत ऋतू मध्ये त्या घरट्यां मध्ये वाढती हालचाल दिसुन येते. कोकिळ पक्षी  गाणं जरी सुंदर गात असला तरी घर बांधण्यात थोडा कच्चा असतो. कोकिळा आपली अंडी कावळ्याच्या घरट्यात देते आणि कावळा त्या अंड्यांची आणि पिल्लांची काळजी घेतो हे सर्वांना माहित असेलच. पक्षी निरीक्षणाकरता सकाळी अगदी उजाडतानाची वेळ  (उन्हाळ्यात अगदी ५:३० पासुन) सगळ्यात छान असते. कोवळ्या उन्हात तुम्हाला पोपटांचे (कीर, राघू, कंठवाला पोपट) थवे निलगिरी, चिंच, पिंपळ, वड अशा झाडांवर झोके घेताना दिसतील. आमच्या इथे तर ते झाडांसोबत लांबलांब वायर्स वर पण मजेत बसलेले दिसतात.  या सगळ्या मोठ्या मोठ्या पक्ष्यांमध्ये इवलेशे   सूर्यपक्षी (sunbirds) नक्कीच लक्ष वेधून घेतात. सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान (अंदाजे १० से.मी.) आकाराचा असतो. त्यांची घरटी झाडावर केर, जळमट लटकल्यासारखी असतात. वसंत ऋतु हा त्यांचा देखील विणीचा हंगाम असतो. बऱ्याचदा समोरच्या चिकूच्या झाडावर वाढलेल्या बांडगूळाच्या फुलांचा रस घ्यायला तो येतो. चिमणी सारखाच दिसणारा ‘फुलचुक्या’ (flower pecker) त्याची फळ मटकवायला येतो. खिडकीतील सोनचाफ्यावर तर पक्षांची भाऊगर्दी झालेली असते. ‘लालबुड्या बुलबुल’, नारदासारखी शेंडी असलेला ‘नारद बुलबुल’, ‘’शिंपी’, कोकीळ, आणि ‘चष्मेवाला’ (oriental white eye) हमखास हजेरी लावून असतात.‘चष्मेवाला’ तर चाफ्याच्या लाल-चुटूक बियांच्या मेजावानीसाठीच बरेचदा तिथे येतो. काळ्यावर पांढरा पट्टा असलेला दयाळ (Oriental Magpie Robin), नाचण (White Browed Fantail Flycatcher) हे सुद्धा आपल्याला घराजवळ दिसतात. तुमच्या घराजवळ एखादी विहीर किंवा पाण्याचा स्रोत असेल तर खंड्या (kingfisher) चे दर्शन सुद्धा घडते. आमच्या घराच्या मागे एक उंबराचे झाड आहे त्यावर तर पक्ष्यांची शाळाच असते. दिवसभरात दर थोड्या वेळानी छोटे मोठे पक्षी येऊन बसतात आणि उंबराच्या फळांचा फडशा पाडतात. साळुंकी, बुलबुल पासुन  ते धनेश, भारद्वाज, घुबड  यांची वर्णी त्यावर लागलेली असते. हे सर्व न्याहाळण्यात तुमचा वेळ ही छान जाईल. आणि चांगली माहिती ही गोळा होईल. बऱ्याचदा या पक्षांच्या बरोबरीनी ‘खारुताई’ आणि रात्रीच्या वेळी झाडांवर येणारे ‘वटवाघूळ’ सुद्धा मी पहिले आहे.

चला तर मग घ्या कागद पेन्सिल आणि कान  टवकारून ऎका कोण कोण आलाय तुमच्या परसदारी, गच्चीत / बाल्कनी मध्ये, building च्या आजुबाजुला असलेल्या झाडांवर आणि दैनंदिनी बनवा.

डॉ. अंकूर पटवर्धन (९८२३८१२६५३), डॉ. तेजस्विनी पाचपोर (७७७४०७५०३१)

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on tumblr
Tumblr
Share on print
Print
Share on email
Email