मुंगी : मित्र का शत्रू ?

आज २२ एप्रिल, ‘अर्थ डे (World Earth Day). म्हणजेच हा दिवस जगभरात ‘जागतिक वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.  पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून याचाच ‘अर्थ’ असा की या पृथ्वीवर असणाऱ्या सर्व प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली आदि जाती, प्रजातींना जगण्याची समान संधी उपलब्ध असणे. म्हणजेच काय तर माणूस जरी या उत्क्रांतीचा रचनेतील एक घटक असला आणि सर्वात वरचढ असला, तरी अगदी माणसासकट सर्व सृष्टीला जगण्याची, वाढण्याची आणि फोफावण्याची सर्वसमान संधी, नैसर्गिक संसाधने उपलब्ध असणे. यात कुणी वरचढ नाही किंवा कुणी खालचा नाही. नैसर्गिक परिसंस्थेत सर्वाना सारखे स्थान. जे स्थान ‘वाघाचे’ तेच एका ‘सारंग’ पक्ष्याचे, तेच एका छोटयाश्या ‘किडा-मुंगीचे’ देखील.    कदाचित म्हणूनच की काय, पण आज आपल्या ‘GOOGLE’ नी त्यांचे ‘DOODLE’ एका  किड्याला  म्हणजेच ‘मधमाशीला’ समर्पित केले आहे.

 

आपण लहानपणी शाळेत असताना हत्ती आणि मुंगीचे विनोद अनेकदा ऐकले आणि मित्र-मैत्रिणीना सांगितले सुद्धा असतील. तसेच बराच वेळ एका जागी बसल्यावर आपल्या पायाला मुंग्या देखील आल्या असतील. किंवा आपल्यातील काही जणांनी ‘Honey I Shrunk The Kids’ नावाचा सिनेमा, ज्यामध्ये माणूस मुंगी येवढा होतो, तो पहिला असेल (नसेल तर अवश्य पहा). म्हणजेच आपल्याला मुंग्या या फारशा नवीन नाहीत J.

 

आज आपण बारकाईने मुंग्यांच्या नजरेनी मुंग्या न्याहाळणार आहोत. आपल्याला मुंग्या  आपल्या भोवताली बघण्याची सवय आहे. आपल्या पैकी बहुतेकांनी मुंगी चावण्याचा अनुभव घेतला आहे. आपण प्रामुख्याने मुंग्या काळ्या आणि लाल एवढ्याच दोन गटात मुंग्यांना विभागतो, पण जर तुम्ही नीट निरखून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या फक्त लाल आणि काळ्या नसून त्यांच्यात देखील खूप विविधता आहे. किड्यांच्या अभ्यास करणाऱ्यांचा चष्म्यातुन जर तुम्ही बघितलत तर तुम्हाला मुंग्यांच्या शेकडो जाती आहेत हे कळेल. मुग्यांच्या अभ्यासाला Myrmecology असे म्हणतात तर मुंग्यांच्या अभ्यासकांना Myrmecologist असे म्हणतात. संपूर्ण जगात मुंग्यांच्या १२००० पेक्षा जास्त प्रजाती असून भारतात त्यातील  ८०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत.   आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग या एवढ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मुंग्या असतात कुठे.? राहतात कुठे ? खातात काय? ह्याचा उत्तर तुम्हाला तुमच्याच परसदारी मिळेल. तुमच्या बागेतल्या फणसाच्या झाडावर, उंबराच्या झाडावर , अगदी स्वयंपाकघरातील ओट्यावर, घराच्या फटीत सुद्धा तुम्हाला मुंग्या दिसतील. आपण मुंगी दिसली कि पहिले तिला पळवून लावण्याच्या मागे लागतो. आज पळवून लावायच्या आधी एकदा निरखून बघू आणि ठरवू ती आपली मित्र आहे का शत्रू.

आपल्या महाराष्ट्राला जैविविधतेचं वरदान लाभलेला आहे त्यामुळे  आपल्या कडे भरपुर वेगवेगळ्या जातीचे प्राणी पक्षी कीटक  आणि वनस्पती दिसून येतात. आपल्या कडे मुंग्यांची सुद्धा खुप विविधतां आहे. आपल्या कडे १९० पेक्षा जास्त प्रजातीच्या मुंग्या दिसून येतात. प्रत्येक अधिवासा प्रमाणें तिथे कुठले सजीव असतील हे ठरते. मुंग्यांच्या बाबतीत सुद्धा त्या अधिवासात कुठली झाडे आहेत, माती कश्या प्रकारची आहे, इतर पशु पक्षी जे मुंग्यांचे शिकारी असतात ते आहेत का? या सर्व गोष्टींवर मुंग्यांचे प्रकार दिसुन येतात. आपण उदाहरणहार्थ उंबराचे झाड हा अधिवास बघूयात. तुम्ही उंबराच्या झाडावर मुंगळा तर नक्की बघितला असेल. मुंगळ्याचे शास्त्रीय नाव आहे Camponotus. या जातीच्या मुंग्या सर्व जगभर आढळून येतात. यात भरपुर उपजाती सुद्धा आहेत. तर ह्या Camponotus जातीच्या मुंग्या कडुलिंब, पिंपळ, साल, नारळ, वड, चंदन या झाडांवर सुद्धा असतात. या निरीक्षणातुन काही  प्रश्न नक्की पडायला हवेत. जसे की ‘उंबऱ्याच्या झाडावर का असतात?’ कारण त्याला फळ असतात. पण मग या बाकीच्या झाडांना गोड़ फळं तर नाहीत मग त्या झाडाला मुंग्या का लागतात? एका झाडावर एकाच प्रकारच्या मुंग्या असतात का वेगवेगळ्या पण असतात? याचे उत्तर असे की मुंगी एखाद्या अधिवासाचा भाग असते त्यावेळी तिला अन्न आणि निवारा या गोष्टी तिथे मिळतात पण त्याच बरोबर मुंगीला सुद्धा त्या अधिवासात काही कर्तव्य पार पाडावी लागतात. मुंगी हा समूहात राहणार कीटक आहे त्यामुळे आपल्याला वारुळाच्या रूपात शेकडो मुंग्या एकत्र राहताना दिसतात. मुंग्या स्वतःच्या गटाप्रती असलेली कार्ये जसे की बेगमी करणे, इतर जातीच्या मुंग्यांपासून आणि इतर शत्रूंपासून सुरक्षा करणे आणि प्रजनन.  तसेच काही मुंग्या या परागीभवनाचे आणि बीज प्रसारणाचे सुद्धा कार्य करतात. त्याचप्रमाणे अधिवासातील इतर घटक जसे बुरशी, झाडे, छोटे प्राणी इतर कीटक यांच्या बरोबर सहजीवनात राहणे हे सुद्धा त्यांचे एक कामच. या इतक्या सगळ्या उद्योगां मुळेच मुंग्या आपल्याला कायम धावपळ करताना दिसतात आणि म्हणूनच कदाचित आपण गमतीने एखाद्या अत्यंत कष्टाळू कार्यमग्न माणसाला मुंगी म्हणत असू.

मुग्यांचा उगम १२० दशलक्ष वर्षां पूर्वी झाला असावा असा म्हणतात. त्यांच्या शरीर रचने मुळे त्या पृथ्वीवरच्या जवळ जवळ सर्व प्रकारच्या अधिवासात आढळून येतात. वेग वेगळ्या अधिवासात टिकून राहण्या करता त्यांच्या शरीर रचनेमध्ये बदल होत गेले. मुंगी च्या शरीराचे काही मुख्य अवयव म्हणजे – संवेदनाग्र (antenna), डोकं (head), जबडा (mandibles), आणि पोट (abdomen). या अवयवांमध्ये बदल होत नवीन प्रजाती तयार झाल्या. त्यामुळे एखादी मुंगी नवीन आहे का ? हे शोधण्या करता हे अवयव वापरले जातात. आपण परत एकदा मुंगळ्याचे उदाहरण बघुयात. मुंगळा जर नीट निरखून बघितला तर आपल्या लक्षात येतेकी बाकी मुंग्यांना पेक्षा Camponotus जातीच्या मुंग्या मोठ्या असतात. त्यांचा रंग, डोक्याचा विशिष्ट्य आकार, शक्तिवान  जबडा (mandibles) हे त्यांना इतरांन पेक्षा वेगळा बनवतात. मुंग्या काय खातात त्याप्रमाणे त्यांच्या mandibles मध्ये बदल होतात. त्या जर विणकाम करत असतील तर त्यांचे mandibles सुई सारखे अणकुचीदार असतात. मुंग्यांची विभागणी त्या काय  खातात, कुठे राहतात (झाडावर, बिळात का घरट्यात), काही विशिष्ट प्रकारचा वर्तन करतात का (behaviour) आणि त्यांची शरीर वैशिष्ट्य यावरून होऊ शकते. आपण त्यांच्या खाण्याच्या खोड्या आधी बघुयात. आपल्याला  मुंग्यां बद्दल एक गोड गैरसमज आहे की त्या फक्त साखर खातात किंवा गोड़ खातात. आपण बघतो त्या गोड़ खाणारया मुंग्यां मध्ये मुंगळा (Camponotus), लाल मुंगी (Myrmicaria), पोंक्षी मुंगी (Tapinoma), Monomorium या जाती प्रामुख्याने दिसुन येतात. या मुंग्या आपल्याला स्वयंपाकघरात, भिंतीतल्या फटीत, अंगणात, बागेतल्या झाडांवर दिसतात . या मुंग्यांना फळ खाणाऱ्या (frugivorous ) मुंग्या म्हणुन ओळखलं जाते. काही मुंग्या धान्य, बीज, झाडाचे पाने हे खातात (e.g  Aphaenogastor, Pheidole). काही मुंग्या तर चक्क मांस भक्षीं आहेत. यातून हे नक्कीच कळून येतं की मुंग्या सुद्धा विविध प्रकारचे अन्न खातात. खाण्या बरोबर राहण्यात सुद्धा मुंग्यांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे घरं लागतात. आपण जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येइल की वारुळाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. प्रत्येक मुंगी आपल्या स्वतःच्या पद्धतींनी वारूळ बनवत असते. Oecophylla जातीची मुंगी चक्क विणकाम करते आणि पानं एकत्र शिवुन घर तयार करते. त्याला आपल्याकडच्या काही भागात ‘ओंबिल’ असे म्हणतात. आम्ही जंगलातून फिरताना जांभळाच्या पानांची विणून केलेली घरटी अनेकदा पाहिली आहेत. तसेच फिरून दमल्यानंतर आंबट असे लाल ओंबिल फस्त सुद्धा केलेत. किंवा त्यांची आंबट-गोड चटणी केलीये. त्यांना पकडायचं विशिष्ठ अशी युक्ती आहे, म्हणजे ते चावत नाहीत. तसेच आणखी एक वेगळी मुंगी म्हणजे Crematogaster. या जातीची मुंगी माती आणि पानं एकत्र करून ऊंच झाडांवर घर बांधते. तिला पखाली मुंगी म्हणतात.

निसर्गामध्ये  अन्नासाखळी खूप महत्वाची असते. मुंगी अन्नासाखळीचा महत्वाचा भाग आहे. मुंग्या-झाडे, मुंग्या-बुरशी, मुंग्या-mealy bug, मुंग्या-फुलपाखरांच्या अळ्या अशी अनेक सहजीवनाची उदाहरणे आहेत ज्यात दोन्ही भागीदार तितकेच महत्वाचे आहेत. दोघं पैकी एक जरी नामशेष झाला तर त्याचा परिणाम दुसऱ्या भागीदारावर लगेच दिसून येतो. आपण मुंगी मारताना असा विचार करतो का? सगळ्या मुंग्या या विनाशक नसतात. आपण जर मुंगीचा त्या परीसंस्थेतला सहभाग जर आधी समजून घेतला तर आपल्याला हे ठरवायला नक्कीच सोपं जाईल की या जातीची मुंगी आपली मित्र आहे का शत्रू. चला तर मग. बघूयात आपल्या आजुबाजुला कोण कोणत्या प्रकारच्या मुंग्या आहेत आणि त्या काय करामती करत आहेत.

डॉ. अंकूर पटवर्धन (९८२३८१२६५३) आणि डॉ. तेजस्विनी पाचपोर (७७७४०७५०३१)  

Share on facebook
Facebook
Share on whatsapp
WhatsApp
Share on twitter
Twitter
Share on linkedin
LinkedIn
Share on tumblr
Tumblr
Share on print
Print
Share on email
Email