पृथ्वीवरच्या सजीवांच्या विविधतेला जैवविविधता असे म्हणतात. किडा -मुंगी, हत्ती, वानर , पक्षी ही जीवांची विविधता तर गवताळ रान, सदाहरित वन हि परिसंस्थेतील विविधता आहे.
लहानपणी शाळेतून आल्यावर एक गोष्ट न चुकता व्हायची. घरी आलं की दप्तर टाकायचं आणि जवळच्या माळरानावर गवतातून उडणाऱ्या छोटया पिवळ्या रंगाच्या फुलपाखरांच्या (कॉमन ग्रास यलो, स्पॉटलेस ग्रास यलो, स्मॉल ग्रास यलो इत्यादि) मागे धावायचं. किंवा चतुर पकडायचे, त्यांच्या पोटाला दोरा बांधायचा आणि हेलीकॉप्टर कसं उडतय ते पाहायचं. किंवा काजवे पकडायचे आणि काडेपेटी मध्ये ते ठेऊन रात्री अंधारात ते पहायचे. असे छंद होते. फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी असल्याने जरा जास्तच लक्ष वेधून घ्यायची. शाळेत असताना बऱ्याचदा आजोबांच्या बरोबर टेकडीवर फिरायला जाण व्हायचं. तेव्हा फुलपाखरे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांवर बसलेली दिसायची. मजा वाटायची खूप.
फुलपाखरांना त्यांच्या सुंदर रंग आणि रचनांमुळे चित्रपतंग असे सुद्धा म्हटले जाते. जगभरामध्ये फुलपाखरांच्या १८००० पेक्षा जास्त प्रजाती आहेत त्यातील १३२० प्रजाती या भारतांतील विविध भागात सापडतात. फुलपाखरांचा उल्लेख हा अगदी वेदांमध्ये सुद्धा आढळतो. हे सर्वश्रुत आहे की हिंदू संस्कृती मध्ये वृक्ष,पशु पक्षी यांना विशेष स्थान आहे. नाग, गाय, अस्वल , कुत्रा, मासा, कासव, मोर, कावळा, घार, गिधाड, खार या सर्वां बरोबर फुलपाखराचा सुद्धा उल्लेख आढळतो.
फुलपाखराचे जीवनचक्र हे चार टप्प्यांचे असते. त्यात फुलपाखरे विशिष्ठ वनस्पतींवर अंडी घालतात, त्यातून अळ्या बाहेर पडतात, ते मग कोष तयार करतात आणि त्यातून फुलपाखराचा जन्म होतो. ह्या प्रक्रियेला मेटामॉर्फोसिस असे म्हणतात. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. यातील प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे. अंडी घालण्या साठी फुलपाखरे झाडे निवडतात आणि त्यावर पानांच्या दोन्ही बाजूला अंडी घालतात. प्रजाती नुसार वेगळ्या वेगळ्या झाडांवर आपल्याला अंडी दिसतात . मुख्यत्वे अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळीला त्या झाडाची पाने खायला मिळावीत या हेतूने फुलपाखरे झाडे निवडतात. जसे की ‘रेड पिएरो’ – पानफुटी, ‘कॉमन लेपर्ड’ – तांबट, ‘कॉमन गल’ – पाचुंदा, ‘कॉमन लाईम’, ‘कॉमन मोर्मोन’ – लिंबूवर्गीय वनस्पती (बेल, कवठ, कढीपत्ता, माकडलिंबू), ‘कॉमन क्रो’, ‘स्ट्राईपड टायगर’, – रुई, कण्हेर च्या जातीतील वनस्पती व वेल इत्यादि. म्हणजे जर ही झाडे नष्ट झाली तर फुलपाखरांचे जीवनचक्र अपुरं राहून जाईल. तसेच वाढती जंगलतोड, अधिवासांचे नुकसान आणि हवामान बदल ह्यामुळे फुलपाखरांच्या संख्येत लक्षणीय घट दिसू लागली आहे.
फुलपाखरांचे नक्की निसर्गातील स्थान काय आहे? ती खरच इतकी महत्त्वाची आहेत का? जर काही कारणाने पृथ्वीवरील फुलपाखरे नष्ट पावली तर काय होईल? हे जाणून घेण्यासाठी आधी आपण पर्यावरणातील फुलपाखरांचे स्थान समजून घेतले पाहिजे. फुलपाखरे हे निसर्गाच्या आणि माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे परागीभवनाचे कार्य पार पाडत असतात. फुलपाखरे ही मुख्यत: कोवळं ऊन आणि स्वच्छ हवेत वाढतात आणि त्यांना अति पाऊस, अति थंडी, अति उकाडा आणि वाढते प्रदूषण सहन होत नाही. वातावरणाच्या बदलाचे निर्देशक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहता येते. म्हणजेच सध्याचा लॉकडाऊन चा कालावधी मध्ये प्रदूषण कमी असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होतो आहे. फुलपाखरे जैवविविधतेच्या साखळीचा महत्वाचा घटक आहेत. फुलपाखरांचे मुख्य अन्न फुलांचा मध / रस आहे. त्या बरोबर काही फुलपाखरे झाडाचा चिक, शेण आणि कुजणारी फळे देखील खातात. बऱ्याचदा आपल्याला फुलपाखरे ही अनेक संखेनी एकत्र येऊन ओलसर मातीत बसलेली दिसतात. तेव्हा ती मातीतील सोडियम, पोटॅशियम सारखे क्षार शोषत असतात. अनेक पक्षी, वटवाघूळे, कीटकभक्षी प्राणी आणि परजीवीचें फुलपाखरे हे अन्न आहेत. फुलपाखराची अळी ही अनेक पक्ष्यांच्या करता त्यांच्या विणीच्या हंगामात प्रथिनांच्या मुख्य स्रोत असते.
“जेव्हा पृथ्वीवरून कीटक नष्ट होतील त्यानंतर मनुष्य नष्ट व्हायला फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी वर्षे राहिली असतील” असे जेव्हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि विविध अभ्यासांचे निष्कर्ष सांगतात तेव्हा या विषयाचे गांभीर्य लक्षात येते. आपण खरच कधी विचार केलाय का अशा जगाचा जिथे फुलपाखरे, मधमाशी, चतुर, भुंगे असे छोटे छोटे कीटक असणारच नाहीत ??. परंतु असं खरच घडत आहे आणि ते ही आपल्याच आजूबाजूला. वाढत्या प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने. जैवविविधता ही झाडे, पशु-पक्षी, प्राणी, विविध प्रकारचे कीटक या सर्वांनी मिळून निर्माण होते. या घटकांच्या आपापसात नाजूक अशा अन्नसाखळ्या आणि अन्न-जाळी विणलेल्या असतात. यातूनच संवेदनशील अशा परिसंस्था जगभर पसरलेल्या आहेत. म्हणजे यातील एखादा घटक सुद्धा जर उद्या संपूर्णत: नष्ट झाला किंवा नामशेष झाला उ.दा. एखादी फुलपाखराची प्रजात जर पूर्णतः नामशेष झाली, तर त्याचा परिणाम त्या फुलपाखराशी निगडित असलेल्या झाडांवर आणि पशुपक्ष्यांवर वर सुद्धा होणार आहे.
चला तर मग. आपण आपला खारीचा वाटा उचलूया. आपल्या घराच्या गँलरी, बाल्कनी, गच्चीवर छोट्या कुंड्यांमधून फुलपाखरांना आवडणारी झाडे लावू या (कढीपत्ता, लिंबू, सोनचाफा, सोनटक्का ई.) आणि त्यांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धन करूया.
डॉ. अंकूर पटवर्धन (९८२३८१२६५३), डॉ. तेजस्विनी पाचपोर ७७७४०७५०३१)